अंधारबन: गर्द झाडीतून वाट शोधताना....

 सह्याद्री च्या डोंगर रांगा फिरत फिरत ताम्हिणी परीसर गाठला. श्रावण सुरु झाला होता. पावसाच्या सरी धरतीवर कोसळत होत्या. जागो जागी हिरव्या रंगाच्या छटा दिसत होत्या. अधून मधून ऊन सावलीचा खेळ सुरु झाला होता, ज्यामध्ये गवताच्या पात्यांवरचे पावसाचे थेंब चमकत होते. अशा मनमोहक निसर्गातून फिरताना मन सुखावून गेले होते. वर्षा ऋतू प्रकर्षाने सांगत होता की ” या सह्याद्रीच्या कडे कपारी जेव्हा हिरवा शालू पांघरून मेघ राजाचे स्वागत करतात, तेव्हा त्या सर्वात सुंदर दिसतात”. अशाच ह्या गर्द झाडीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका जंगलाची सफर करण्याची संधी त्या वेळेस चालून आली.

घराच्या शेजारी एक शेतकरी जोडपे राहत होते. गप्पा मारता मारता एक वेळ त्यांनी विचारले ” जाऊन आले का हो तुमी जंगलाच्या पल्याड?” असे विचारले असता मी जरा गोंधळून गेले कारण नजर फिरवावी तिथे घनदाट जंगल च दिसत होते. त्यांना विचारले कि “दादा कशाबद्दल बोलत आहात ? ” तेव्हा ते म्हणाले कि ” अहो! अंधारबन बद्दल बोलतोय ताई”. त्या क्षणाला ठरवले कि कितीही पाऊस कोसळत असेल तरीही दुसऱ्या दिवशी अंधारबन ला जायचंच.

 सर्व तयारी करून आदल्या रात्री झोपायला गेले. मुसळधार पाऊस कोसळत होता. पण निश्चय केला होता की काहीही करून अंधारबन गाठायचेच. दुसऱ्या दिवशी ठरल्यानुसार शेजारच्या काकांना घेऊन अंधारबन ची वाट धरली. सुरुवातीला थोडीशी उघडीप होती. सकाळची वेळ असल्यामुळे पर्वत कस्तुराची शीळ दऱ्या खोऱ्यात घुमत होती. त्याच्या सोबतीने वेडे राघू तारेवरच्या कसरती करण्यास सज्ज झाले होते. एक खंड्या छोट्याश्या तळ्याकाठी एका तारेवर झोके घेत बसला होता.

हे सर्व पाहत माझी वाटचाल जंगलाच्या बाजूने चालू होती.

अंधारबन या नावानेच अंगावर शहारा आला होता. काय असेल ? कसे असेल? … सह्याद्री च्या कुशीत वसलेले एक अद्भुत रहस्य म्हणजे अंधारबन, ज्याचा अंदाज बाहेरून बघितल्यावर नाही तर तेथे जंगलात जाऊन च येतो. जंगलात शिरायच्या अगोदर उजव्या हाताला एके ठिकाणी मोठा धबधबा आहे तिथे वाकून काकांनी नमस्कार केला. त्यांना विचारले ” काका इकडे तर देऊळ नाही देव नाही मग तुम्ही नमस्कार कशाला केलात?” तेव्हा काकांनी सांगितले कि याच धबधब्या वर वास आहे तो वाघजाई देवीचा, बोट वर करून दाखवले तेथे एक मोठी शिळा होती. त्यावर लांबून काहीतरी कोरले आहे हे दिसत होते. तीच वाघजाई देवी. जी या वनाचे संरक्षण करते . देवीचा आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला. पाऊस रिपरिप चालू होता. रस्ता अरुंद होत होता. पाणी घोट्यापर्यंत आले होते पाय कुठे देऊन चालावे बूट घसरत तर नाही ना या पेक्षा आजूबाजूला एखादा साप किंवा एखादे फुपाखरू, पक्षी दिसत असेल आणि त्या क्षणाला तिकडे थांबून त्या दृश्याचा किती आस्वाद घेता येईल या कडे लक्ष जास्त होते. जसे जसे जंगलाच्या आत जात होते दुतर्फा कारवी ची झाडे वाढली होती. रस्ता छोटा झाला होता आणि पाण्याची पातळी वाढत होती. थोडे अंतर पार केल्यावर मोठा धबधबा होता. तो पार करण्यासाठी आधीच तेथे पुरेश्या दोऱ्या आणि जाळ्या लावण्यात आल्या होत्या. कारण अंधारबन हे नुसते जंगल नसून गिर्यारोहकांसाठी स्वर्ग आहे. अनेक गिर्यारोहक येथे दरवर्षी न चुकता येतात.

 धबधबा ओलांडून आम्ही पुढे आलो. थोड्याश्या चढणी नंतर खालची खोल दरी स्पष्ट दिसत होती. वाऱ्याच्या वेगाने ढग दरीतून जंगलाकडे जात होते. गारव्या बरोबर पाऊसाचे थेम्ब चेहऱ्याला येऊन आपटत होते. थंडी बोचायला लागली होती. ते दृश्य मनात साठवून मी पुढे निघाले. कारवीच्या दाट झुडूपांमधून रस्ता शोधत आम्ही पुढची वाटचाल सुरु ठेवली. रस्त्याच्या कडेला असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या बघायला मिळत होत्या. मधूनच मुंग्यांचा किल्ला देखील पाहिला. आखीव रेखीव गोलाकार भींत असलेला हा सुबक किल्ला एक उत्तमतेचे उदाहरण आहे.

 जसे आत शिरत होतो तसा प्रकाश खूपच कमी झाला सकाळच्या वेळेत अंधार आहे असे भासू लागले. गर्द झाडी खूपच कमी प्रकाश आणि चारी बाजूला धुके.

पुढचा माणूस पूर्ण स्पष्ट दिसणार नाही एवढे धुके नक्कीच होते. पाण्याची पातळी थोडी खालावली होती. जंगलाचा ठराविक वास असतो तो चहू बाजूंनी वातावरणात भरून उरला होता. पाण्याचा खळखळाट आणि पर्वत कस्तुराची शीळ एक वेगळेच निसर्गाचे गाणे ऐकवत होती. गर्द दाट झाडी आता एका निमुळत्या तोंडाकडे वळत होती.

झऱ्याचा झूळ झूळ आवाज धबधब्याच्या घोंघावणाऱ्या आवाजात विरून जाऊ लागला. वाट संपते तेथून एक प्रकाश झोत आत डोकावत होता. घनदाट जंगला मध्ये एक सुंदर आशेचा किरण शिरू पाहत होता. तेथे पोचून बघत च राहिले. समोर दोन धबधबे एकमेकांत मिसळत होते आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. संपूर्ण जंगल त्या आवाजानी दुम-दुमले होते. हा रौद्रावतार एका दोरी च्या सहाय्याने पार करायला लागणार होता. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जशी उतरले तसे लागलीच पाण्याने गुडघ्याची पातळी ओलांडली होती. जसे पाण्याचे लोट माझ्यावर येऊन अदालत होते तसे समजत होते की या निसर्गामध्ये केवढी शक्ती आहे आणि या प्रकृतीच्या शक्ती पुढे मनुष्याचे बळ तिनक्या एवढे सुद्धा नाही. शेवटी मजल दरमजल करत हा टप्पा देखील पार केला आणि त्यानंतर वाट धरली ती शेवटच्या टप्प्याची. कारवी ची झाडे मार्ग दर्शवत होतीच. छोटे छोटे खेकडे सुद्धा होते सोबतीला. आता पाय बोलू लागले होते. तितक्यात काकांनी आवाज दिला, एका ठिकाणी डावीकडे खाली उतरायचे होते.
जसे काकांच्या मागे गेले तसे ते म्हणले हा ताई आला शेवटचा टप्पा. आता येथून आपण परत मागे फिरणार

समोर पहिलं आणि सगळे कष्ट यातना विसरून गेले. मी पठारावर उभी होते दरीच्या तोंडाशी. हीच कुंडलिका दरी. एक मोठ्ठा ढग दारी मधून वर येत होता. सोसाट्याचा वर होता आणि पाऊस सुद्धा. जसा ढग वर आला आणि मागचे दृश्य दिसले, डोळ्याचे पारणे फिटले. एक राकट सह्याद्रीचा कडा समोर निधड्या छातीने ऊन,वारा, पाऊस सोसत होता. त्यावरून सुमारे २८ धबधबे कोसळत होते. वाऱ्यामुळे धबधब्यातले पाणी विरुद्ध दिशेला उडत होते. कारवी ची झाडे कड्यावरून झुलत होती आणि हिरवे गवत दरीच्या काठावर नाचत होते.

ऊन सावलीचा खेळ संपूर्ण दरीतून फेर धरून बागडत होता आणि ढगांचा ताफा अधून मधून संपूर्ण चित्राने रंगवलेला फळा पुसत होता . याच साठी केला होता एवढा अट्टाहास. या दृश्यासाठी कितीही डोंगर दऱ्या, कडे कपाऱ्या ओलांडायची तयारी होती मनाची. एके काळी याच डोंगर दऱ्या ओलांडून मावळ्यांनी इतिहासावर वेगळी छाप सोडली होती. शिवाजी महाराजांनी ज्या सह्याद्रीला आपले केले,ज्याच्या अंगाखांद्यांवर खेळून महाराष्ट्र स्थापिला तोच हा सह्याद्री.

“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरी तून नाद गुंजला , महाराष्ट्र माझा !!”

या ओळी चटकन मनात घर करून गेल्या. समोरचे चित्र मनात साठवून मागे फिरायची वेळ झाली होती. हे जंगल, गर्द दाट झाडी, ऊन सावलीचा खेळ सर्व एकदा मन भरून पाहून घेतले आणि स्वतःशीच ठरवले कि पुढच्या श्रावणात अजून एकदा हाच अनुभव घ्यायला परत नक्की येणार.

धन्य ती भूमी जी सुजला सुफला आहे, ती भारत भूमी जी आज या अढळ सह्याद्री ला स्वतःच्या खांद्यांवर पेलून वर्षानुवर्षे उभी आहे.

निवेदिता जोशी
४. १०. २०२३