रत्नागिरीचे फुरसे...

दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जनः।
सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे ॥

( दुर्जन आणि साप यांची तुलना केली तर दुर्जनच वाईट ठरतो. साप कारण असेल तेव्हाच चावतो परंतु दुर्जन वारंवार वाईट गोष्टी करत राहतो)

प्राचीन काळापासूनच भारतात आणि विशेषतः हिंदू धर्मात सर्पांना खूप महत्वाचे स्थान आहे.  पौराणिक ग्रंथ धार्मिक स्थळे व मूर्ती, गड- किल्ले अश्या अनेक ठिकाणी विविध रूपांमध्ये सापांचे अस्तित्व आजही टिकून आहे. हिंदू रूढी आणि अध्यात्मिक परंपरेनुसार, साप हा एक दुष्ट प्राणी नसून शाश्वतता तसेच भौतिकता, जीवन-मृत्यू आणि काळ यांचे प्रतिनिधित्व करणारी देवता आहे असे मानले जाते. परंपरागत सापांचे खेळ करून लोकांचे मनोरंजन करणारे गारुडी आणि जादुगार मंडळी भारतीय लोककलेचा एक अविभाज्य भाग होते मात्र कालानुरूप हि कला लोप पावताना दिसून येते.  नागपंचमी च्या दिवशी पूर्वीपासून मराठी घराघरात नागाची मातीची प्रतिकृती पुजली जाते आणि गोड पदार्थ व दुधाचा प्रसाद दिला जातो. असे असले तरी लोकांच्या मनात सर्पांबद्दल आदरयुक्त भीती कायमच दिसते.

असे मानले जाते. परंपरागत सापांचे खेळ करून लोकांचे मनोरंजन करणारे गारुडी आणि जादुगार मंडळी भारतीय लोककलेचा एक अविभाज्य भाग होते मात्र कालानुरूप हि कला लोप पावताना दिसून येते.  नागपंचमी च्या दिवशी पूर्वीपासून मराठी घराघरात नागाची मातीची प्रतिकृती पुजली जाते आणि गोड पदार्थ व दुधाचा प्रसाद दिला जातो. असे असले तरी लोकांच्या मनात सर्पांबद्दल आदरयुक्त भीती कायमच दिसते.

सापांविषयीचे अनेक समज-गैरसमज पूर्वीपासून अंधश्रद्धेच्या स्वरुपात पसरवले गेले, निगेटीव्ह गोष्टी लिहून प्रसिद्ध केल्या गेल्या आणि त्यामुळेच तो दिसला कि ठेचा अशी भावना लोकांमध्ये रुजत गेली. साप डूख धरतो, त्याच्या डोक्यावर नागमणी असतो ज्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते हि त्यातली काही उदाहरणे. मात्र आज परिस्थिती फारच वेगळी आहे. काही प्रमाणात जनजागृती केल्याने लोकांमध्ये किमान सर्पमित्रांना बोलावण्याची जागृकता आली आहे. सर्पमित्र, सर्पांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, टीव्ही माध्यमे आणि सोशल मिडियाचा ह्यात मोलाचा वाटा आहे.

निसर्गाच्या सानिध्यात काम करत असताना विविध प्रकारच्या सापांना जवळून बघण्याची संधी मला लाभली. कोंकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात मिळणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात भीतीचे काहूर उठवणार्या ह्या मूर्ती लहान पण कीर्ती महान अश्या “ फुरसं “ प्रजातीच्या सापाबद्दल लिहिण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न.

इंग्रजी मध्ये ह्याला सॉ स्केल्ड व्हाईपर ( Saw Scaled Viper ) असे म्हणतात. संकटाची जाणीव झाली कि अंगावरचे खवले एकमेकांवर घासून  करवत घासल्यासारखा आवाज करण्याच्या त्याच्या सवयीमुळेच त्याला हे नाव दिले असावे. साधारणपणे वितभर ते एक हात लांबी, मातकट करडा रंग आणि त्रिकोणी डोक्यावर स्पष्ट दिसणारा बाण हि त्याची ठळक वैशिष्ट्य. पाण्यात जशी साखर विरघळून जाते त्याचप्रमाणे हे फुरसे जमिनीच्या विविध रंगसंगतीत बेमालूमपणे मिसळून जाते. सड्यांवर, गवताळ कुरणात, शेतजमिनीच्या बांधांमध्ये, दगडाखाली अश्या विविध ठिकाणी फुरशी वास्तव्य करतात. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर भक्ष्यावर तुटून पडण्याची ह्याची जबरदस्त क्षमता प्रत्यक्ष पाहताना अंगावर काटा उभा राहिला नाही तर नवलच !!! १/३ सेकंद एवढ्या कमी वेळात तो दंश करून परत आपल्या मूळ जागेवर जाऊ शकतो

( संदर्भ : https://youtu.be/9I4jLMUXQWo?si=XaoPNwXYw8yxtUYh ).

फुरष्याची गणना भारतात मिळणाऱ्या ४ प्रमुख विषारी सापांमध्ये होते. ह्या जमातीचे विष हिमोटोक्सिक प्रकारात मोडते. अश्या प्रकारचे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. बेडूक, सरडे, पाली, विंचू आणि लहानसहान किडे हे त्याचे प्रमुख खाद्य. बहुतांशी सूर्यास्तानंतर किवा संधी प्रकाशात बाहेर पडणारी हि प्रजाती आहे.  त्यामुळे कोकणात रात्रीच्या वेळी वावरताना वाहनांची वर्दळ असणार्या डांबरी रोडवरतीसुद्धा इंग्रजी “S” किवा “8” आकारात एखादा साप वाकडा तिकडा जाताना दिसलाच तर तो लांबून च बघणे शहाणपणाचे ठरेल.

विराज वि. आठल्ये

ऑक्टोबर २०२३

( संदर्भ : https://youtu.be/9I4jLMUXQWo?si=XaoPNwXYw8yxtUYh ).